दुसर्या महायुध्दाच्या वरवंट्यातून फ्रान्स सावरत असतानाच १९५०-५१ दरम्यान फ्रान्सची वसाहत 'अल्ज्सीर्स' येथे मुक्तीचे वारे बाहायला लागले होते. १९५४-१९६२ या आठ वर्षात अल्जीर्स ने फ्रान्सला गनीमी युध्द्दाने व अहिंसक चळवळीने बेजार केले होते. (संदर्भ :'बॅटल ऑफ अल्जीर्स') शेवटी या लढ्याचा फ्रान्सवर होणारा परिणाम पाहता , तत्कालीन राष्ट्रपती 'जनरल द गॉल' यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अल्जीर्सला स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले. बहुतांश फ्रेंच नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पण सैन्यातील काही असंतुष्ट आधिकार्यांना हा निर्णय पसंत पडला नाही. त्यांच्या मते 'द गॉल' यांनी फ्रान्सशी दगलबाजी केलीय व फ्रेंच नागरिकांचा विश्वासघात केलाय.
अशा आधिकार्यांनी OAS हा गट स्थापन केला आणि 'द गॉल' यांना देशद्रोही मानून त्यांना शासन म्हणून त्यांची हत्या करायचे ठरवले होते. त्या संपूर्न घटनाक्रमाचा वेध 'द डे ऑफ जॅकल.
' या चित्रपटात घेतलाय.
फ्रेडरिक फोरसीथ यांनी लिहिलेल्या 'द डे ऑफ जॅकल' या कादंबरीवरुन हा चित्रपट घेतलाय. फ्रेड झीनमन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. चित्रपटाची सुरुवात फ्रेंच संसदेत राष्ट्रपती व मंत्र्यांची बैठक सुरु आहे या द्रुश्याने होते. बैठक संपताच एकेक मंत्री परतायला लागतो आणि सर्वात शेवटी स्वतः राष्ट्रपती निघतात. ते स्वतः एका गाडीत मागे आणखी एक गाडी सुरक्षारक्षकांची आणि दोन मोटरसायकलीवरुन एकेक सैनिक एवढ्याच व्यवस्थेवर ते निघतात, कुठलाही डामडौल नाही की सुरक्षेचा डामडौल नाही. गाड्या पॅरीसच्या रस्त्यांवरुन जात असताना एक स्कूटरस्वार हळूहळू त्यांचा पाठलाग करतो. त्याच वेळी काही अंतरावर OASचे काही आक्रमक दबा धरुन बसले असतात. 'द गॉल' यांची गाडी त्यांच्या टप्प्यात येताच अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात होते, पण गाड्या न थांबता पुढे सटकून जातात. केवळ ७ सेकंदात ११४ गोळ्या झाडल्या गेल्या पण चमत्कारिकरित्या कुणीही दगावले नाही, केवळ छोट्या जखमांवर काम भागते. हा हल्ला फसल्यामुळे OAS चे कर्तेधर्ते जिनिव्हात पळून जातात तर या घटनेमागे OAS आहे हे कळाल्यावर फ्रान्स मध्ये जोरदार नाकेबंदी व धरपकड सुरु होते.
हल्ला निष्फळ झाल्याने OAS चे मनोधैर्य खचलेले असते , त्यांची आर्थिक नाकेबंदी व पकडले जाणारे कार्यकर्ते यामुळे संघटना विस्कळीत होते. अशावेळी एखाद्या परदेशी 'काँट्रॅक्ट किलर' ला सुपारी देऊन 'द गॉल' यांची हत्या करण्याचे OAS ठरवते. बर्याच शोधानंतर त्यांना हवी असलेली व्यक्ती मिळते व त्याच्यासह जिनिव्हात एक गुप्त बैठक केली जाते. बर्याच घासाघीशीनंतर अर्धा मिलियन पौंड आणि त्याच्या मर्जीने आणी योजनेने काम करण्याच्या अटीवर ती व्यक्ती काम स्वीकारते. ही व्यक्ती म्हणजेच 'जॅकल'. योजनेनुसार जॅकल आपल्या कामाला सुरुवात करतो. तर त्याला देण्याची रक्कम गोळा करण्यासाठी OAS बॅंका, दागिन्यांची दुकाने लुटायला सुरुवात करते. या लुटालिटीने हैराण होऊन पोलीस माग काढायला सुरुवात करतात. संशयाची सुई अर्थातच OAS कडे वळते. आणि गुप्तहेरांच्या मदतीने OAS प्रमुखांचा ठावठिकाणा लागतो. ते तिघे रोममध्ये एका हॉटेलात राहत असतात. त्यांची स्वतःची अशी कडक सुरक्षाव्यवस्था असते, पण त्यांच्यातील एकच माणूस आत-बाहेर येजा करत असतो, त्याच्याव पाळत ठेवून फ्रान्सचे पोलीसखाते त्याला इटलीतून पळवून पॅरिस येथे आणते व त्याच्च्याकडून काही माहिती मिळते का याचा प्रय्त्न केला जातो. त्याच्याकडून फक्त 'जॅकल' हे नाव कळते.
आत्ता मधल्या काळात १४ जुलैला जॅकल फ्रान्समध्ये दाखल होतो. अर्थातच पासपोर्ट नकली असतो. ओळखीने एक स्नायपर बंदुका बनवण्यात तज्ञ अशा व्यक्तीकडे , या कार्यासाठी आवश्यक असणारी बंदुक बनवण्याची ऑर्डर देतो तर एका भुरट्या चोराकडून बनावट फ्रेंच कागदपत्रे तयार करुन घेतो. इकडे फ्रेंच मंत्रीमंडळाची आणिबाणीची बैठक भरते व त्यात कमिशनर 'क्लॉडी लीबल' यास जॅकल यास पकडण्यास पाचारण करण्यात येते व त्याला विशेष आधिकारही दिले जातात. मग सुरु होतो चोर-पोलीसाचा खेळ, कमिशनर लीबल दररोज धावपळ करत, परदेशातील पोलीस खात्यांशी सुसंवाद राखत जॅकल कोण आहे याचा शोध सुरु करतो तर ;जॅकल' आपल्या वाटेत येणारे अडथळे दूर करत हल्ल्ल्याच्या तयारीला लागतो. शेवटी जॅकलला शोधण्यात पोलिसांना यश येते का अथवा जॅकल त्याच्या कामात यशस्वी होतो का हा पुढचा घटनाक्रम प्रत्यक्ष पाहणेच उत्तम.
या चित्रपटात आवडलेल्या गोष्टी म्हणजे १९६२-६३ काळातील फ्रान्सचे दर्शन, कलाकारांची कामे, पटकथा, दिग्दर्शकाने शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंगवत ठेवणे, उत्कंठावर्धक शेवट इ.इ. कमिशनर लिबेल ८ -९ दिवस जवळपास न झोपता जेव्हा १०व्या दिवशी घरी झोपलेला असतो आणि त्याची पत्नी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हाची त्याची गाढ झोप, जॅकल एका लंगड्या म्हातार्याचे सोंग करुन एका इमारतीत घुसतो आणि बांधून ठेवलेला पाय मोकळा केल्यानंतर त्याच्या पायाला आलेल्या मुंग्या आणि काही क्षण चालताना झालेला त्रास, बंदुकीचे डिटेलिंग आणी ती बंदूक लपवण्यासाठी केलेली क्लृप्ती, जेव्हा पोलीसांना कळते की हा खरा कोण आहे तेव्हा बचावण्यासाठी वापरलेली शक्कल लाजवाब. एखादा काँट्रॅक्ट किलर आपल्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी जी तयारी करतो जसे की 'लोकेशन स्काउटिंग' (स्थळ दौरा), हत्याराची निवड आणी त्याचे परिक्षण, स्वता:चे बनावट नाव सिध्द करण्यासाठी बाळगली जाणारी कागदपत्रे तसेच संकटकाळातून बचावण्यासण्यासाठी सदैव तयार असणारा 'प्लॅन बी' या चित्रपटात मस्त दाखवलयं. तर सर्व यंत्रणा पणाला लावून एखाद्याचा शोध घेणे, त्यासाठी करावी लागणारी अविरत धावपळ, अविश्रांत मेहेनत, योग्य वेळी योग्य माहिती न मिळाल्याबद्दल तसेच वेळोवेळी जॅकलने दिलेल्या चकव्यामुळे पोलीसांची झालेली चरफड व त्रागा अतिशय उत्तम दाखवलयं.
कादंबरी वाचली नसेल आणि या सत्य घटनेबद्दल विशेष माहिती नसेल तर हा चित्रपट अवश्य बघा.
No comments:
Post a Comment