"कमॉन बॉलिंग यार!! शॉट रे... अरे जातोय जातोय आपलाच प्लेयर आहे..अरे फिल्डिंग करतोयस की कोंबड्या पकडतोयस..." कुठल्याही क्रिकेट मैदानावर ऐकू येणारी ही वाक्ये. मलाही ही वाक्ये वापरायला मिळाली, ऐकायला मिळाली ती मेडिकल कॉलेजच्या ग्राउंड्वर, तीही १९९८ ते २००७ पर्यंत. क्रिकेट म्हणजे जीव की प्राण असणार्या भारतीयांपैकी मी एक, १९९६ ला मियांदाद आउट झाल्यावर केलेला जल्लोष अथवा १९९८ ला आलेले 'डेझर्ट स्टॉर्म' क्रिकेट हा शालेय जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला. क्रिकेट खेळायला गुंतवणुक म्हणजे काय , तर एक बॅट , एक बॉल आणी स्टंप म्हणून काहीही आणि बरोबर काही भिडू, बस्स..ही जुळवाजुळव करता करता केव्हा मित्र मिळाले ते कळालेच नाही. :-)
क्रिकेट हे आपल्या भावना व्यक्त करण्याच माध्यम आहे असं वाटणं गैर नाही. जिथे पाकिस्तान विरुध्द जिंकलो की जणू काही आप्ल्या घरात शुभकार्य घडतयं अशा भावनेने जल्लोष करणारा सामान्य भारतीय संघ पराभूत झाला की दु:खात बुडतो. स्वतःच्या अपूर्ण अपेक्षा , महत्वाकांक्षा तो जणू या भारतीय क्रिकेट संघाकडून पूर्ण होतील अशी अपेक्षा बाळगतो. मग हे क्रिकेट शालेय जीवनात तर जणू काही अस्त्र असल्यासारखे वापरले गेल्यास नवल नाही. मीही क्रिकेट कडे एक मार्ग म्हणून पाहिले. जो मार्ग मला माझ्या भावना मोकळ्या करायला मदत करेल..वैयक्तिक आयुष्यात आलेलं अपयश, निराशा विसरण्यास मदत करेल , मी खरा कोण आहे हे शोधण्यास मदत करेल असा मार्ग. या मार्गावरुन चालताना अनेक अनुभव आले..सुखद, दु:खद, पण एक नक्की की त्यांनी आमच्या मनावर जो ठसा उमटवलाय तो पुसला जाणार नाही.
मग अशा या मार्गावर चालण्याची सुरुवात तर ५-६वीतच झाली, गल्लीत खेळताना , टिवी वर जसं क्रिकेटर्स खेळताना दिसतात तशीच कॉपी करायचा प्रयत्न करायचो. नियम बियम काय कुणाला माहिती नाहीत, पण सगळे जमून दंगा घालायचो. या क्रिकेट खेळण्याची खरी ओळख झाली ती ९वीत. शाळेतील काही मित्र प्रत्येक शनीवार- रविवारी मेडिकल कॉलेज ग्राउंडवर (जे माझ्या घराच्या अगदी जवळ होतं) किंवा आदर्श शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळायची. त्यांचे ३-४ संघही होते, त्यांच्या बोलण्यात कायम हाच विषय.."लास्ट ओवर मी टाकयला नको होती..बॅटींग करताना का घाबरतोयस.." या संघातील असणारी खुन्नसपण जाणवायची. मलाही मग वाटलं की चला एकदा जाऊन तर बघू, यांच्यात सामील तर होऊ, खेळायला मिळेल तसेच नवीन मित्रपण मिळतील. हा माझा (नकळत का होईना) सर्वोत्कृष्ट निर्णयांपैकी एक निर्णय आहे असं मला आत्ता जाणवतय.
या ८-१० वर्षांच्या क्रिकेटकाळाला आयुष्याचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल इतका सुंदर होता. त्यावेळी जमलेले भिडू आज माझे सर्वोत्तम मित्र आहेत. त्यावेळी ज्यांच्याबरोबर भांडलो, ज्यांच्याविरुध्द त्वेषाने खेळलो तेही स्नेही आहेत. या 'टीन-एज' काळात आम्ही जे क्रिकेट खेळलो, त्या आठवणी आजही ताज्या आहेत. आम्ही केवळ क्रिकेट खेळलो नाही (किंवा ते तसं कुणाकडून खेळलं जाणं शक्य नाही) , या क्रिकेटच्या रुपात एक सुंदर असं विश्व तयार केलं, 'आदर्श' नाही की जिथे केवळ आम्हीच राजे, पण असं विश्व की ज्याने आमच्या जीवनाला आकार दिला
. एखाद्याचा राग आलेला असेल किंवा त्याच्याबद्दल चीड असेल , त्याची विकेट काढल्यावर किंवा त्याला चौकार-षटकार मारल्यावर होणारा आनंद, त्यावेळी अवर्णनीयच होता. एखाद्याची जिरवायची आहे, एखाद्या मित्राला प्रोत्साहन द्यायचयं, शाळेत असताना मिरवायला आवडायच असेल तर क्रिकेटसारखा पर्यायच नव्हता. मला मार्क कमी पडताय पण माझ्यासारखा बॅट्समन कोण नाही, मला घरात कायम ओरडतात पण क्रिकेट मैदानावर मीच राजा, असेल तो कुणी फास्टेस्ट बॉलर पण मी त्याला आरामत फोडू शकतो..ही भावना क्रिकेटने दिली.
या आठ-दहा वर्षात जे क्रिकेट खेळलो, अनुभवलो, यामध्यमातूअन जे मित्र मिळवले त्या आठवणी शब्दात व्यक्त करण गरजेचं वाटलं, या आठवणी मनात असतातच पण अशा बाकी मित्रांच्या आठवणी जर एकत्र स्वरुपात आणायला जमलं तर मग आमच्या साठी ते 'अलीबाबाची गुहा'च ठरेल. आज कुणी म्हणेल तुम्ही जेव्हा जेव्हा भेटताय तेव्हा बोलण्यात हा विषय येतोच ना पण मग असं शब्दात (लिखित स्वरुपात) साठवण्याची काय गरज? मान्य आहे, या भूतकाळातील आनंददायी आठवणीतच रमत बसण्यात अर्थ नसेलही कदाचित पण या आयुष्य नावाच्या प्रवासात, 'जरा विसावू या वळणावर' ठरणारे हे क्रिकेटचे वळण शब्दरुपी झाडच ठरतील ही खात्री आहे.
No comments:
Post a Comment