Monday, January 24, 2011

स्वरभास्कराचा अस्त

आज स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे दु:खद निधन झाले. भीमसेन जोशींबद्द्ल वेगळं काही लिहायला अथवा बोलायला नको, त्यांची गायकीच ते कार्य करते. किराणा घराण्याचे दिग्गज गायक व कंठ संगीतातील रत्न असे भीमसेन जोशी खर्‍या अर्थाने भारताचे रत्न आहेत.

image

मी काही शास्त्रीय संगीतातील तज्ञ नाही अथवा शास्त्रीय संगीताचे तोंडओळख असलेला नवशिकाही नाही. केवळ त्यांच्या स्वराने मोहीत व मंत्रमुग्ध झालेल्या करोडो श्रोत्यांपैकी एक. त्यांचा भारदस्त आवाज, खर्जातील स्वर व स्वरांची जादूई ताकद ही मला जाणवलेली वैशिष्ट्ये, अर्थात त्यांच्या रागदारी अथवा गायकीबद्दल मी काही बोलणे अशक्य आहे. पंडितजींना पहिल्यांदा अभंगवाणीतून ऐकले, 'माझे माहेर पंढरी', 'टाळ बोले चिपळीला' तसेच 'बाजे रे मुरलिया' यासारख्या भजनांनी त्यांच्याबद्द्ल उत्सुकता निर्माण केली. त्यांच्या विठ्ठलाच्या भजनांनी आषाढी-कार्तिकी एकादशीबद्द्ल ओढ निर्माण झाली, विठ्ठलाचे नाव त्यांच्या भजनामुळे घेतले जात होते. जणू स्वर्गातून स्वर येउन सर्व आकाश व्यापतात अशी भावना त्यांची भजने ऐकताना असायची.

हळूहळू  जेव्हा शास्त्रीय संगीत ऐकण्यास सुरुवात केली तेव्हा तर स्वरभास्कर उपाधी सार्थ ठरवतील अशी गायकी केवळ थक्क करुन जाते. निलेशमुळे मला त्यांच्या चीजा ऐकायला मिळाल्या आणि त्या चीजांचा शास्त्रीय पध्दतीने अर्थ व मह्त्व सांगितल्यामुळे , पंडितजी कळण्यास आधिकच मदत झाली, माझे दुर्दैव की मला शास्त्रीय संगीतातील मूलभूत गोष्टीही माहिती नाहीत, नाहीतर पंडितजींच्या गायकीस आधिकाधिक॑ जाणून घेता आले असते. एखादी गोष्ट आपल्याजवळ नसते तेव्हाच त्याची किंमत समजते हे सत्य पंडितजींच्या स्वरुपात पुन्हा एकदा सामोरे आले. ईश्वर पंडितजींच्या आत्म्यास शांती देवो.

पंडितजींचा यमन

No comments: