Thursday, May 8, 2008

आयुष्यावर बोलू काही!!

आयुष्यावर बोलू काही... साद गेली आणि संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रतिसाद दिला। चला दोस्तहो... आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून जरा वेळ काढू... विश्राम करू... या सुंदर आयुष्याच्या कवित्वाचा आनंद घेऊ.
संदीप खरे व सलील कुलकर्णी या दुकलीने आपल्या काव्य-संगीताने आज साऱ्या महाराष्ट्राला मोहित केले आहे। ना कुठले अवजड शब्द ना कुठली अवघड सुररचना, साध्या शब्द-सुरांनी प्रत्येकाच्या मनाला साद घालत, प्रत्येकाच्या हृदयातल्या हळव्या कप्प्याला स्पर्श करीत गेली १० वर्षे यांनी मराठी मनाला रसस्वाद घ्यायची संधी दिली.
"आयुष्यावर बोलू काही" हा अत्यंत रसपूर्ण असा अनुभव आहे. यातले प्रत्येक गीत, प्रत्येक कविता आपल्या दररोजच्या जीवनातील वर्णन वाटते. शीर्षक गीतच मनाला स्पर्शून जाते, विचार करायला प्रव्रुत्त करते. "गाडी सुटली" हे गीत तर मी आत्तपर्यंत ऐकलेले सर्वात सुंदर असे विरहगीत हे गाणे ऐकतना त्या कवितेतिल नायकाची अवस्था ही आपल्या जीवनातीलच एक प्रसंग आहे असे जाणवते. ती अवस्था ही केवळ प्रेयसीच्या विरहाची असावी असे मुळिच नाही, तर एका नात्यात गुंफलेल्या दोन जीवॅही कथा व्यक्त होते. ही कविता ऐकताना कायम मनाला चुटपुट लागते.
"नसतेस घरी तू जेव्हा" ही कविता तर फरच सुंदर, कविता जरी पती-पत्नी वा प्रियकर प्रेयसी यांच्या विरहाची असली तरी या कवितेतल्या विरहाचे भाव हे आपल्या जीवनात अनुभवयाला मिळतात। घरात आई जर नसली वा काही काळाकरिता ती घरात नसेल तर येणारी अवस्था अशीच होते, खास मित्रांपासून ताटातूट झाल्यावर पण निर्माण होणारी पोकळी या गीतातून व्यक्त होते.


"मी मोर्चा नेला नाही", "आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो", "देवा मला रोज एक अपघात कर" अशा कविता तर साध्या शब्दात सामान्य माणसाचे जीवन प्रतिबिंबीत करतात. "तुझ्या माझ्यासवे कधी यायचा पाऊस ही" ही कविता पावसाला आणखी सुंदर बनवते. "मन तळ्यात मळ्यात", "अताशा मला असे काय होते" या कविता जेव्हा सांगितीक रुपात येतात तेव्हा मनाला मिळणारी शांतता भावून जाते.
केवळ प्रेम, विरह, सामान्य माणसांचे आयुष्य एवढ्यापुरत्या या कविता मर्यादित न राहता "व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची" हे भान आपल्याला देतात."नामंजूर" चा गर्ज करित प्रस्थापित रुढी परंपरा यांना आव्हान देतात. "तरूणाई" च्या भावना व्यक्त करताना "सांग सख्या रे" अशी विचारपूस करतात.
लहान बालकांना "बबलगम" देताना व त्यांना "सुपरमान" व वाड्यातल्या "बूम बूम बा" च्या गोष्टी सांगताना मोठ्यांना त्यांच्या बालपणीच्या आठवण करून देतात। अशा अनेक कवितांतून व या कवितांना मिळालेली संगिताची अप्रतिम साथीतून आपल्या आयुष्याचा प्रवास ऊलगडून जातो व शिर्षका प्रमाणे आपणही नकळत आयुष्यावर बोलून जातो.


केवळ अप्रतिम अशा या सांगितीक प्रवासाचा प्रत्येकाने किमान एकदा तरी अनुभव घ्यावा. माझ्यासारखे अनेक मंडळी या प्रवासात अनेकदा सहभागी होतात व प्रत्येक वेळी हा कार्यक्रम नवीन अशा सुखद समाधानाची अनुभूती देतो.
शेवटी संदीप-सलीलच्या शब्दात सांगायचे झाले तर,
" जरा चुकीचे, जरा बरोबर, बोलू काही,
चला दोस्तहो, आयुष्यावर बोलू काही"

No comments: