Friday, January 28, 2011

मला आवडलेला चित्रपट - 'द डे ऑफ जॅकल'

दुसर्‍या महायुध्दाच्या वरवंट्यातून फ्रान्स सावरत असतानाच १९५०-५१ दरम्यान फ्रान्सची वसाहत 'अल्ज्सीर्स' येथे मुक्तीचे वारे बाहायला लागले होते. १९५४-१९६२ या आठ वर्षात अल्जीर्स ने फ्रान्सला गनीमी युध्द्दाने व अहिंसक चळवळीने बेजार केले होते. (संदर्भ :'बॅटल ऑफ अल्जीर्स')  शेवटी या लढ्याचा फ्रान्सवर होणारा परिणाम पाहता , तत्कालीन राष्ट्रपती 'जनरल द गॉल' यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अल्जीर्सला स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले. बहुतांश फ्रेंच नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पण सैन्यातील काही असंतुष्ट आधिकार्‍यांना हा निर्णय पसंत पडला नाही. त्यांच्या मते 'द गॉल' यांनी फ्रान्सशी दगलबाजी केलीय व फ्रेंच नागरिकांचा विश्वासघात केलाय.

अशा आधिकार्‍यांनी  OAS हा गट स्थापन केला आणि 'द गॉल' यांना देशद्रोही मानून त्यांना शासन म्हणून त्यांची हत्या करायचे ठरवले होते. त्या संपूर्न घटनाक्रमाचा वेध 'द डे ऑफ जॅकल.
' या चित्रपटात घेतलाय.


फ्रेडरिक फोरसीथ यांनी लिहिलेल्या 'द डे ऑफ जॅकल' या कादंबरीवरुन हा चित्रपट घेतलाय. फ्रेड झीनमन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. चित्रपटाची सुरुवात फ्रेंच संसदेत राष्ट्रपती व मंत्र्यांची बैठक सुरु आहे या द्रुश्याने होते. बैठक संपताच एकेक मंत्री परतायला लागतो आणि सर्वात शेवटी स्वतः राष्ट्रपती निघतात. ते स्वतः एका गाडीत मागे आणखी एक गाडी सुरक्षारक्षकांची आणि दोन मोटरसायकलीवरुन एकेक सैनिक एवढ्याच व्यवस्थेवर ते निघतात, कुठलाही डामडौल नाही की सुरक्षेचा डामडौल नाही. गाड्या पॅरीसच्या रस्त्यांवरुन जात असताना एक स्कूटरस्वार हळूहळू त्यांचा पाठलाग करतो. त्याच वेळी काही अंतरावर OASचे काही आक्रमक दबा धरुन बसले असतात. 'द गॉल' यांची गाडी त्यांच्या टप्प्यात येताच अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात होते, पण गाड्या न थांबता  पुढे सटकून जातात. केवळ ७ सेकंदात ११४ गोळ्या झाडल्या गेल्या पण चमत्कारिकरित्या कुणीही दगावले नाही, केवळ छोट्या जखमांवर काम भागते. हा हल्ला फसल्यामुळे OAS चे कर्तेधर्ते जिनिव्हात पळून जातात तर या घटनेमागे OAS आहे हे कळाल्यावर फ्रान्स मध्ये जोरदार नाकेबंदी व धरपकड सुरु होते. 

 

हल्ला निष्फळ झाल्याने OAS चे मनोधैर्य खचलेले असते , त्यांची आर्थिक नाकेबंदी व पकडले जाणारे कार्यकर्ते यामुळे संघटना विस्कळीत होते. अशावेळी एखाद्या परदेशी 'काँट्रॅक्ट किलर' ला सुपारी देऊन 'द गॉल' यांची हत्या करण्याचे OAS ठरवते. बर्‍याच शोधानंतर त्यांना हवी असलेली व्यक्ती मिळते व त्याच्यासह  जिनिव्हात एक गुप्त बैठक केली जाते. बर्‍याच घासाघीशीनंतर अर्धा मिलियन पौंड आणि त्याच्या मर्जीने आणी योजनेने काम करण्याच्या अटीवर ती व्यक्ती काम स्वीकारते. ही व्यक्ती म्हणजेच 'जॅकल'. योजनेनुसार जॅकल आपल्या कामाला सुरुवात करतो. तर त्याला देण्याची रक्कम गोळा करण्यासाठी OAS बॅंका, दागिन्यांची दुकाने लुटायला सुरुवात करते. या लुटालिटीने हैराण होऊन पोलीस माग काढायला सुरुवात करतात. संशयाची सुई अर्थातच OAS कडे वळते. आणि गुप्तहेरांच्या मदतीने OAS प्रमुखांचा ठावठिकाणा लागतो. ते तिघे रोममध्ये एका हॉटेलात राहत असतात. त्यांची स्वतःची अशी कडक सुरक्षाव्यवस्था असते, पण त्यांच्यातील एकच माणूस आत-बाहेर येजा करत असतो, त्याच्याव पाळत ठेवून फ्रान्सचे पोलीसखाते त्याला इटलीतून पळवून पॅरिस येथे आणते व त्याच्च्याकडून काही माहिती मिळते का याचा प्रय्त्न केला जातो. त्याच्याकडून फक्त 'जॅकल' हे नाव कळते.

आत्ता मधल्या काळात १४ जुलैला जॅकल फ्रान्समध्ये दाखल होतो. अर्थातच पासपोर्ट नकली असतो. ओळखीने एक स्नायपर बंदुका बनवण्यात तज्ञ अशा व्यक्तीकडे , या कार्यासाठी आवश्यक असणारी बंदुक बनवण्याची ऑर्डर देतो तर एका भुरट्या चोराकडून बनावट फ्रेंच कागदपत्रे तयार करुन घेतो. इकडे फ्रेंच मंत्रीमंडळाची आणिबाणीची बैठक भरते व त्यात कमिशनर 'क्लॉडी लीबल' यास जॅकल यास पकडण्यास पाचारण करण्यात येते व त्याला विशेष आधिकारही दिले जातात. मग सुरु होतो चोर-पोलीसाचा खेळ, कमिशनर लीबल दररोज धावपळ करत, परदेशातील पोलीस खात्यांशी सुसंवाद राखत जॅकल कोण आहे याचा शोध सुरु करतो तर ;जॅकल' आपल्या वाटेत येणारे अडथळे दूर करत हल्ल्ल्याच्या तयारीला लागतो. शेवटी जॅकलला शोधण्यात पोलिसांना यश येते का अथवा जॅकल त्याच्या कामात यशस्वी होतो का हा पुढचा घटनाक्रम प्रत्यक्ष पाहणेच उत्तम.

या चित्रपटात आवडलेल्या गोष्टी म्हणजे १९६२-६३ काळातील फ्रान्सचे दर्शन, कलाकारांची कामे, पटकथा, दिग्दर्शकाने शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंगवत ठेवणे, उत्कंठावर्धक शेवट इ.इ. कमिशनर लिबेल ८ -९ दिवस जवळपास न झोपता जेव्हा १०व्या दिवशी घरी झोपलेला असतो आणि त्याची पत्नी  त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हाची त्याची गाढ झोप, जॅकल एका लंगड्या म्हातार्‍याचे सोंग करुन एका इमारतीत घुसतो आणि बांधून ठेवलेला पाय मोकळा केल्यानंतर त्याच्या पायाला आलेल्या मुंग्या आणि काही क्षण चालताना झालेला त्रास, बंदुकीचे डिटेलिंग आणी ती बंदूक लपवण्यासाठी केलेली क्लृप्ती, जेव्हा पोलीसांना कळते की हा खरा कोण आहे तेव्हा बचावण्यासाठी वापरलेली शक्कल लाजवाब. एखादा काँट्रॅक्ट किलर आपल्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी जी तयारी करतो जसे की 'लोकेशन स्काउटिंग' (स्थळ दौरा), हत्याराची निवड आणी त्याचे परिक्षण, स्वता:चे बनावट नाव सिध्द करण्यासाठी बाळगली जाणारी कागदपत्रे तसेच संकटकाळातून बचावण्यासण्यासाठी सदैव तयार असणारा 'प्लॅन बी' या चित्रपटात मस्त दाखवलयं. तर सर्व यंत्रणा पणाला लावून एखाद्याचा शोध घेणे, त्यासाठी करावी लागणारी अविरत धावपळ, अविश्रांत मेहेनत, योग्य वेळी योग्य माहिती न मिळाल्याबद्दल तसेच वेळोवेळी जॅकलने दिलेल्या चकव्यामुळे पोलीसांची झालेली चरफड व त्रागा अतिशय उत्तम दाखवलयं.

कादंबरी वाचली नसेल आणि या सत्य घटनेबद्दल विशेष माहिती नसेल तर हा चित्रपट अवश्य बघा.

Monday, January 24, 2011

स्वरभास्कराचा अस्त

आज स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे दु:खद निधन झाले. भीमसेन जोशींबद्द्ल वेगळं काही लिहायला अथवा बोलायला नको, त्यांची गायकीच ते कार्य करते. किराणा घराण्याचे दिग्गज गायक व कंठ संगीतातील रत्न असे भीमसेन जोशी खर्‍या अर्थाने भारताचे रत्न आहेत.

image

मी काही शास्त्रीय संगीतातील तज्ञ नाही अथवा शास्त्रीय संगीताचे तोंडओळख असलेला नवशिकाही नाही. केवळ त्यांच्या स्वराने मोहीत व मंत्रमुग्ध झालेल्या करोडो श्रोत्यांपैकी एक. त्यांचा भारदस्त आवाज, खर्जातील स्वर व स्वरांची जादूई ताकद ही मला जाणवलेली वैशिष्ट्ये, अर्थात त्यांच्या रागदारी अथवा गायकीबद्दल मी काही बोलणे अशक्य आहे. पंडितजींना पहिल्यांदा अभंगवाणीतून ऐकले, 'माझे माहेर पंढरी', 'टाळ बोले चिपळीला' तसेच 'बाजे रे मुरलिया' यासारख्या भजनांनी त्यांच्याबद्द्ल उत्सुकता निर्माण केली. त्यांच्या विठ्ठलाच्या भजनांनी आषाढी-कार्तिकी एकादशीबद्द्ल ओढ निर्माण झाली, विठ्ठलाचे नाव त्यांच्या भजनामुळे घेतले जात होते. जणू स्वर्गातून स्वर येउन सर्व आकाश व्यापतात अशी भावना त्यांची भजने ऐकताना असायची.

हळूहळू  जेव्हा शास्त्रीय संगीत ऐकण्यास सुरुवात केली तेव्हा तर स्वरभास्कर उपाधी सार्थ ठरवतील अशी गायकी केवळ थक्क करुन जाते. निलेशमुळे मला त्यांच्या चीजा ऐकायला मिळाल्या आणि त्या चीजांचा शास्त्रीय पध्दतीने अर्थ व मह्त्व सांगितल्यामुळे , पंडितजी कळण्यास आधिकच मदत झाली, माझे दुर्दैव की मला शास्त्रीय संगीतातील मूलभूत गोष्टीही माहिती नाहीत, नाहीतर पंडितजींच्या गायकीस आधिकाधिक॑ जाणून घेता आले असते. एखादी गोष्ट आपल्याजवळ नसते तेव्हाच त्याची किंमत समजते हे सत्य पंडितजींच्या स्वरुपात पुन्हा एकदा सामोरे आले. ईश्वर पंडितजींच्या आत्म्यास शांती देवो.

पंडितजींचा यमन

Friday, January 21, 2011

क्रिकेटिंग मेमरीज..

"कमॉन बॉलिंग यार!! शॉट रे... अरे जातोय जातोय आपलाच प्लेयर आहे..अरे फिल्डिंग करतोयस की कोंबड्या पकडतोयस..." कुठल्याही क्रिकेट मैदानावर ऐकू येणारी ही वाक्ये. मलाही ही वाक्ये वापरायला मिळाली, ऐकायला मिळाली ती मेडिकल कॉलेजच्या ग्राउंड्वर, तीही १९९८ ते २००७ पर्यंत. क्रिकेट म्हणजे जीव की प्राण असणार्‍या भारतीयांपैकी मी एक, १९९६ ला मियांदाद आउट झाल्यावर केलेला जल्लोष अथवा १९९८ ला आलेले 'डेझर्ट स्टॉर्म' क्रिकेट हा शालेय जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला. क्रिकेट खेळायला गुंतवणुक म्हणजे काय , तर एक बॅट , एक बॉल आणी स्टंप म्हणून काहीही आणि बरोबर काही भिडू, बस्स..ही जुळवाजुळव करता करता केव्हा मित्र मिळाले ते कळालेच नाही. :-)

क्रिकेट हे आपल्या भावना व्यक्त करण्याच माध्यम आहे असं वाटणं गैर नाही. जिथे पाकिस्तान विरुध्द जिंकलो की जणू काही आप्ल्या घरात शुभकार्य घडतयं अशा भावनेने जल्लोष करणारा सामान्य भारतीय संघ पराभूत झाला की दु:खात बुडतो. स्वतःच्या अपूर्ण अपेक्षा , महत्वाकांक्षा तो जणू या भारतीय क्रिकेट संघाकडून पूर्ण होतील अशी अपेक्षा बाळगतो. मग हे क्रिकेट शालेय जीवनात तर जणू काही अस्त्र असल्यासारखे वापरले गेल्यास नवल नाही. मीही क्रिकेट कडे एक मार्ग म्हणून पाहिले. जो मार्ग मला माझ्या भावना मोकळ्या करायला मदत करेल..वैयक्तिक आयुष्यात आलेलं अपयश, निराशा विसरण्यास मदत करेल , मी खरा कोण आहे हे शोधण्यास मदत करेल असा मार्ग.  या मार्गावरुन चालताना अनेक अनुभव आले..सुखद, दु:खद, पण एक नक्की की त्यांनी आमच्या मनावर जो ठसा उमटवलाय तो पुसला जाणार नाही.

मग अशा या मार्गावर चालण्याची सुरुवात तर ५-६वीतच झाली, गल्लीत खेळताना , टिवी वर जसं क्रिकेटर्स खेळताना दिसतात तशीच कॉपी करायचा प्रयत्न करायचो. नियम बियम काय कुणाला माहिती नाहीत, पण सगळे जमून दंगा घालायचो. या क्रिकेट खेळण्याची खरी ओळख झाली ती ९वीत. शाळेतील काही मित्र प्रत्येक शनीवार- रविवारी मेडिकल कॉलेज ग्राउंडवर (जे माझ्या घराच्या अगदी जवळ होतं) किंवा आदर्श शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळायची. त्यांचे ३-४ संघही होते, त्यांच्या बोलण्यात कायम हाच विषय.."लास्ट ओवर मी टाकयला नको होती..बॅटींग करताना का घाबरतोयस.." या संघातील असणारी खुन्नसपण जाणवायची. मलाही मग वाटलं की चला एकदा जाऊन तर बघू, यांच्यात सामील तर होऊ, खेळायला मिळेल तसेच नवीन मित्रपण मिळतील. हा माझा (नकळत का होईना) सर्वोत्कृष्ट निर्णयांपैकी एक निर्णय आहे असं मला आत्ता जाणवतय.

या ८-१० वर्षांच्या क्रिकेटकाळाला आयुष्याचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल इतका सुंदर होता. त्यावेळी जमलेले भिडू आज माझे सर्वोत्तम मित्र आहेत. त्यावेळी ज्यांच्याबरोबर भांडलो, ज्यांच्याविरुध्द त्वेषाने खेळलो तेही स्नेही आहेत. या 'टीन-एज' काळात आम्ही जे क्रिकेट खेळलो, त्या आठवणी आजही ताज्या आहेत. आम्ही केवळ क्रिकेट खेळलो नाही (किंवा ते तसं कुणाकडून खेळलं जाणं शक्य नाही) , या क्रिकेटच्या रुपात एक सुंदर असं विश्व तयार केलं, 'आदर्श' नाही की जिथे केवळ आम्हीच राजे, पण असं विश्व की ज्याने आमच्या जीवनाला आकार दिला

. एखाद्याचा राग आलेला असेल किंवा त्याच्याबद्दल चीड असेल , त्याची विकेट काढल्यावर  किंवा त्याला चौकार-षटकार मारल्यावर होणारा आनंद, त्यावेळी अवर्णनीयच होता. एखाद्याची जिरवायची आहे, एखाद्या मित्राला प्रोत्साहन द्यायचयं, शाळेत असताना मिरवायला आवडायच असेल तर क्रिकेटसारखा पर्यायच नव्हता. मला मार्क कमी पडताय पण माझ्यासारखा बॅट्समन कोण नाही, मला घरात कायम ओरडतात पण क्रिकेट मैदानावर मीच राजा, असेल तो कुणी फास्टेस्ट बॉलर पण मी त्याला आरामत फोडू शकतो..ही भावना क्रिकेटने दिली.

या आठ-दहा वर्षात जे क्रिकेट खेळलो, अनुभवलो, यामध्यमातूअन जे मित्र मिळवले त्या आठवणी शब्दात व्यक्त करण गरजेचं वाटलं, या आठवणी मनात असतातच पण अशा बाकी मित्रांच्या आठवणी जर एकत्र स्वरुपात आणायला जमलं तर मग आमच्या साठी ते 'अलीबाबाची गुहा'च ठरेल. आज कुणी म्हणेल तुम्ही जेव्हा जेव्हा भेटताय तेव्हा बोलण्यात हा विषय येतोच ना पण मग असं शब्दात (लिखित स्वरुपात) साठवण्याची काय गरज?  मान्य आहे,  या भूतकाळातील आनंददायी आठवणीतच रमत बसण्यात अर्थ नसेलही कदाचित पण या आयुष्य नावाच्या प्रवासात, 'जरा विसावू या वळणावर' ठरणारे हे क्रिकेटचे वळण शब्दरुपी झाडच ठरतील ही खात्री आहे.

IMG_0959